कोंकण महाराष्ट्र

पक्ष आणि विचार बदलणाऱ्या राणेंनी सिंधुदुर्गात किती उद्योग आणले- आ. वैभव नाईक

सिंधुदुर्ग – सतत पक्ष आणि विचार बदलत असणाऱ्या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मागील पंचवीस वर्षात किती उद्योग आणलेत. केंद्र आणि राज्‍यातील भाजप सरकारने सिंधुदुर्गसाठी किती निधी दिला. त्‍यातून किती रोजगार संधी उपलब्‍ध झाल्‍या हे प्रथम जाहीर करावे आणि नंतरच मतदारांना विकास कामे करणार नसल्‍याची धमकी द्यावी अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज केली. तसेच ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीच्या माध्यमातून लढविली जात असल्‍याचीही माहिती त्‍यांनी दिली. येथील विजय भवन मध्ये नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्‍यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, बँकेचे संचालक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

नांदगाव येथील प्रचार सभेत आमदार नीतेश राणे यांनी तेथील मतदारांना दिलेल्‍या धमकीचा समाचार नाईक यांनी घेतली. ते म्‍हणाले, आमच्या विचाराचा सरपंच निवडून आला असे धमकावणाऱ्या राणेंनी सिंधुदुर्गात किती निधी आणला हे आधी जाहीर करावे. तसेच राणे कुटुंब दुसऱ्या पक्षात गेल्‍यानंतर त्‍यांचे विचार सतत बदलत असतात. त्‍यामुळे तुमची नेमकी विचारधारा कोणती हे देखील त्‍यांनी स्पष्‍ट करावे. शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, आंबेडकर चळवळीतील वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हातात हात घालून काम करणार आहेत. त्यामुळे एकत्र येण्याची भूमिका आम्ही ठेवली आहे. या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत वैचारिक लढाई होती. त्यामुळे जातीयवादी पक्षांना विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे. त्याहीपेक्षा भाजप विरोधात आपल्याला मत द्यायचे आहे. ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. दरम्‍यान गेली वीस पंचवीस वर्षे सोबत असलेली जनता आता आपल्या सोबत नाही, असे दिसल्याने निधी देताना आपल्या विचाराचा सरपंच निवडून आणा असे सांगण्याची वेळ राणेंवर आली आहे. मात्र आमच्या करातून निधी मिळतो तो तुमच्या खिशातून मिळत नाही असा टोलाही खोत यांनी लगावला आहे.

सतीश सावंत म्हणाले, वंचित आघाडी आणि शिवसेना एकत्रित येऊन जिथे शक्य आहे तेथे लढत देत आहेत. नितेश राणे यांची दादागिरी मोडीत काढण्यासाठी कणकवली मतदारसंघांमध्ये आम्ही सज्ज आहोत. गेल्या आठ वर्षात हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जे ऐकत नाही त्यांच्या नातेवाईकांच्या बदल्या केल्या जात आहेत. जिल्हा बँकेत नोकरी देतो म्हणून हजारो अर्ज घेऊन आमीष दाखवले जात आहे. ही प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी गावात निश्चितच परिवर्तन होणार आहे.

बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष परूळेकर म्हणाले, जिल्ह्यातील जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाठिंबा देत आहोत. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने १२ ठिकाणी सरपंच उमेदवार तर शभंर ठिकाणी सदस्य उमेदवार उभे केले. त्याला सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment