पश्चिम महाराष्ट्र

नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर – दत्तांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवार २९ नोव्हेंबर पासून दत्त जयंती उत्सवास प्रारंभ झाला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा दत्त जयंती उत्सव शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर अखेर साजरा केला जाणार आहे. तर येथील दत्त मंदिरात बुधवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दत्तांचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे.या दत्त जयंती उत्सवाचे मानकरी अवधूत नारायण घाटे पुजारी हे असून नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थांच्या सहकार्याने त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या दत्त जन्म सोहळा उत्सव काळात येथील दत्त मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता गुरुचरित्र पारायण, सकाळी १० ते १२ या वेळेत लघुरुद्राभिषेक, दुपारी १२.३० वाजता मुख्य चरण कमलांची महापूजा, महा नैवेद्य, दत्त देव संस्थान मार्फत येथील भैरमभट्ट जेरी प्रसादालय येथे दुपारी १.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ पवमान पंचसूक्त पठण, दुपारी ४ ते ५ वेदमूर्ती दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण, सायंकाळी ७ ते ९ धूप दीप आरती व पालखी सोहळा, रात्री ९.३० ते ११ हभप रोहित दांडेकर (मिरज) यांचे कीर्तन असे नित्य कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार १ डिसेंबर रोजी श्रीधर सुतार (कोल्हापूर) स्वरानंद वाद्य वृंद प्रस्तुत भक्तीसंगीत व भावगीत, शुक्रवार २ डिसेंबर रोजी सावनी शिखरे (पुणे) भक्ती गीत व शास्त्रीय गायन, शनिवार ३ डिसेंबर रोजी पुणे येथील मुकुंद वादारायणी यांचे स्वर समर्थ अभंग वाणी प्रस्तुत भक्तीगीत व अभंग, रविवार ४ डिसेंबर रोजी प्रथमेश लघाटे यांचे न प्रथम स्वर प्रस्तुत भक्ती संगीताची सुश्राव्य .

मैफिल, सोमवार ५ डिसेंबर रोजी पुणे येथील रविराज दामले यांचे समर्पण स्वरूप प्रस्तुत भक्ती संगीत भावगीत व कविता वाचन, मंगळवार ६ डिसेंबर रोजी वारणानगर येथील दिपाली प्रसाद लोहार यांचे शास्त्रीय गायन व कृष्णा जितेंद्र भोसले (मिरज) यांचे तबलावादन असे विशेष कार्यक्रम होणार आहेत.
तर बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ५ हभप रोहित दांडेकर यांचे जन्मकाळ कीर्तन होऊन मुख्य मंदिरात जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर भक्त भाविकांच्या दर्शनासाठी पाळणा उत्सवाचे मानकरी येथील टेलिफोन ऑफिस समोरील अवधूत नारायण घाटे, निलेश अवधूत घाटे यांचे घरी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.दरम्यान दत्त जन्मकाळ सोहळ्यानिमित्त दत्त देव संस्थांमार्फत दक्षिण उत्तर घाटावर निवारा मंडप, विद्युत रोषणाई, मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती दत्त देव संस्थांचे अध्यक्ष सदाशिव पुजारी, सचिव संजय पुजारी यांनी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment