वसंतोत्सव आणि कोकणी माणसाचा शिमगोत्सव
विवेक ताम्हणकर, कोंकण
शिमगोत्सव म्हणजे कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा सण. कोकणात शिमगोत्सवाला काही दिवसात सुरुवात होईल.
या उत्सवातील महत्वाचा उत्सव म्हणजे होळी, या वर्षी १७ मार्चला कोकणात होळी घालण्याच्या कार्यक्रमाची रंगत अनुभवता येणार आहे.

यानंतर कोकणातील ग्रामदेवतांच्या पालख्या देवळाबाहेर पडतील. गावात दाखल झालेल्या चाकामान्यांसह कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांच्या या पालख्या डोक्यावर घेऊन नाचत शिमगोत्सवात सहभागी होतो. वसंतोत्सवाच्या रंगात निसर्ग न्हाऊन निघाला असताना कोकणी माणसाची शिमगोत्सवातील लोकसंस्रंकृतीतील विविध कलांची रंग उधळण सर्वांनाच आनंद देऊन जाते.
कोकणात फाक पंचमीच्या दिवशीच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. शिमगोत्सवाच्या चाहुलीनेच कोकणच्या गावागावातील ग्रामदेवतांची मंदिर सजू लागतात.
गावाचे गावकर आणि मानकरी ग्रामदेवतेच्या मंदिरात जमतात आणि सुरु होतो देवांना पालखीत विराजमान करण्याचा सोहळा. कोकणात याला पालखीला रुप लावण्याचा सोहळा म्हटलं जातं.

वर्षातून ठराविक दिवशीच देव पालखीत विराजमान होतात . त्यांना पालखीत कोणी बसवायचं-त्याचं पूजन कोणी करायचं याचे मान निश्चित असतात. देवाच्या आकर्षक मूर्ती वस्त्रालंकारांसह विराजमान केल्या जातात. विधिवत पूजन करत देव पालख्यात विराजमान होतात. गावाचा गुरव उत्सव सुरळीत पार पडावा म्हणून पाहिलं गाऱ्हाणं घालतो आणि इथूनच शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. गावच्या मुख्य होळीच्या आधी अनेक गावात ग्रामस्थ जंगलात जाऊन छोट्या छोट्या होळ्या आणतात.
शेवरीच्या झाडाच्या या होळ्या फाकपंचमीच्या दिवशी ग्रामस्थ जंगलातून होळी म्हणून तोडून आणतात. ढोलताशांच्या गजरातच ही होळी वाजत गाजत आणली जाते. रात्री उशिरा गावातील ग्रामस्थ नाचवतच ही होळी गावात घेऊन येतात. या होळीला मग निशाण, मानाचे नारळ लावले जातात हार-तुरे घालून होळी सजवली जाते. मग वर्षानुवर्षांच्या ठरलेल्या जागी होळी उभी केली जाते. मानकरी होळीची पूजा करतात आणि याच होळीभोवती होम पेटवला जातो.

याच कोकणच्या शिमगोत्सवाचं वैशिष्ट्यं म्हणजे या शिमगोत्सवातच देव पालख्यात बसून कोकणी माणसाच्या घराघरात येतात. दारात आलेल्या पालख्यांचे जल्लोषात स्वागत होतं. वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच या पालख्या घरं घेतात या मानपानात कोणताच बदल होत नाही. कोकणी माणूस वर्षभर कितीही लांब असला तरी ज्या दिवशी देव घरी येतो त्या दिवशी तो आपल्या कोकणातील घरी परततो. दरम्यान या काळात प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतांच्या पालख्या मंदिराबाहेर पडतात.
या काळात कोकणातील कोणत्याही गावात गेलात तर आपल्या ग्रामदेवतेची पालखी डोक्यावर घेऊन नाचणारा कोकणी माणूस आपल्या पाहायला मिळतो. आपल्या गावाचं ग्रामदैवत म्हणजे कोकणी माणसाचं सर्वोच्च श्रद्धास्थान. कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात कधी खांद्यावर, कधी एकावर एक चढत तर कधी एकट्याने अख्खी पालखी डोक्यावर घेत देह-भान विसरुन नाचणारा कोकणी माणूस आपल्याला पाहायला मिळतो.
या दहा दिवसात कोकणी माणूस गावात दाखल झालेल्या चाकरमान्यांसह आपले परंपरागत मान आणि चालीरीती जपत हा उत्सव जल्लोषात साजरा करतो.
सिंधुदुर्गातील शिमगोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दशावतार, बाल्यानृत्य, जाखडीनृत्य, नमनखेळ ही कोकणातील ग्रामीण लोककला. सिंधुदुर्ग परिसरात मात्र हुडोत्सव ची परंपरा आहे.
होळीसाठी उभ्या केलेल्या झाडावर असलेले निशाण एक व्यक्ती खाली आणत असते. खाली उभ्या असलेल्या व्यक्ती त्याच्यावर विविध वस्तूंचा मारा करत असतात तो मारा चुकवत त्याला जावे लागते. आठवडाभर मुखवटा घालून विविध सोंगे रंगविण्यात येतात. देवगड विजयदुर्ग या किनारपट्टीवर गाबीत बांधवांची वस्ती मोठी आहे.
येथे उत्सवात गावपाटलांना विशेष महत्व असते. कुलदैवत, ग्रामदैवत, मांडकरी यांचे पूजन केले जाते. देवता पूजन, गाऱ्हाणे, घुमट वाद्यांचे पूजन याला विशेष महत्व असते. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी कोळी बांधव होड्यांची पूजा करतात.
मासेमारीसाठी पुरुष समुद्रात जातात. मात्र होळीच्या दुसऱ्या दिवशी होड्यावर जाण्याचा मान स्त्रियांना असतो. होडी समुद्रात नांगरून त्याची पूजा करतात. काहीजण समुद्रात होडीतून फेरी मारतात. कोणताही उत्सव साजरा करण्याची प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा असते. शिमगोत्सव मध्ये देखील ती पहावयास मिळते.
कोकणातील होळी उत्सवात विजयदुर्गच्या गाबीत शिमगोत्सला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या उत्सवादरम्यान मौखिक परंपरेतून आलेले फाग गायले जातात. फाग हा शिग्माखेळ नाट्यातील महत्वाचा भाग आहे. त्याची रचना ओवीसारखी असते परंतु हा गीतप्रकार म्हणजे ओवी नव्हे.
फाग १
विजयदुर्ग नऽगऽरी होऽऽ विजयदुर्ग नऽगऽरी
की डंका गर्जेऽ चौबदऽरीऽऽ होऽऽ
किल्ला बांऽधऽलाऽ संबूर होऽ नेस्तावरीऽऽ
आणि होऽ वेताळ हाऽय वरीऽऽ किल्याचा दरीवजा भुतूऽर होऽ
आणि रेऽ रामलिंग महाराऽज होऽऽ
रामलिंग महाराऽजऽ देऊळ बांऽधलेऽ खोरीऽतऽऽ
देऊळ बांऽधलेऽ खोरीऽत की आंगराऽ आहे त्याच्या बाजूऽसऽऽ
(शब्द अर्थ – १ संबूर- समोर , २ नेस्तावरी – जमिनीचे समुद्रात घुसलेले टोक, ३ भुतूर – आतमध्ये )
फाग २
प्रथऽम दसऱ्याचेऽ दिवऽशीऽ होऽऽ इंग्रज आले होऽ बाऱ्यावऽरऽ होऽऽ
नांगर टाकून होऽऽ नांगर टाकून गाऽऽ
टाकून हवल्यावऽरऽ माऽऽर देतो किल्यावऽरऽऽ
सुमराण करूऽन होऽऽ सुमराण करूऽन गाऽऽ
करूऽन रामेशाऽचेऽ सेने गोळे माऽरी तोऽऽ
गोळा पडलाऽ होऽऽ गोळा पडला गाऽऽ
पडलाऽ तरांड्यावरीऽ तरांडा जाळायास लागऽलाऽऽ
नांगर कापून होऽऽ नांगर कापून गाऽऽ
कापून वरच्यावरीऽऽ इंग्रज पळायास लागला होऽऽ
इंग्रज गेलाऽ होऽऽ गेला इलायत्या नगराऽलाऽऽ
गेलाऽ इलायत्या नगराऽ हिल्लार घालून मारावा त्यालाऽऽ
कोकणच्या लोकजीवनातील होळी या गीतांप्रमाणे ऐतिहासिक घटनांचा येथील मानवी मनात जागर करणारीही ठरते.