कृषीनिष्ठ बाहे गावच्या शेतकऱ्यांना भाजी मळ्यांनी मिळवून दिले आर्थिक उन्नतीचे स्त्रोत.
रोहा,दि.१३ (प्रतिनिधी)
रोहा तालुक्यातील ताज्या व हिरव्या पाले भाज्यांकरिता सुप्रसिद्ध असणाऱ्या व नावलौकिक कमविलेल्या ताज्या भाजीच्या विक्रमी उत्पादनामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे व उन्नतीचे मोठे स्त्रोत निर्माण करून दिले आहे.
ताज्या भाजीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाहे गावच्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कुटुंबासमवेत अथक परिश्रम घेत अतिशय कष्टाने आपल्या वडिलोपार्जित भातशेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करून हिरवेगार नंदनवन फुलविलेल्या ताज्या भाजीच्या विक्रमी उत्पादनामुळे येथील शेतकरी वर्गाला मोठाच दिलासा मिळवून मोठे आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.
बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने भातशेती बरोबरच कडधान्ये पिके व हिरवीगार मिरची, माठ,पालक,मेथी, वांगी,टॉमोटा, कोबी, कोथंबिर,भेंडी,दुधी, भोपळा, घेवडा,आदी कमी कालावधी मध्ये अधिक उत्पन्न देणारी नगदी पिके येथे पिकविली जात आहेत.
शेतकरी वर्गाच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजना विशेषतः भाजीपाल्याच्या पिकासाठीच्या योजना तालुका कृषी खाते व एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर यांच्या वतीने राबविल्या जात असल्याने त्याचाही चांगला फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. वेळोवेळी केलेले माती परीक्षण प्रक्रिया व पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत वातावरणीय बदलानुसार कोणती पिके फायदेशीर ठरतील याचे अभ्यासपूर्वक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व अवलंबन करीतयोग्य मार्गदर्शन केले जात आहे.
अतिशय कष्टाने आपल्या वडिलोपार्जित भातशेती जमिनी मध्ये नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतांचे वापर करून हिरवेगार नंदनवन फुलविलेल्या ताज्या भाजीच्या विक्रमी उत्पादनामुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचे मोठे स्त्रोत निर्माण झाले आहे असे येथील कृषिनिष्ठ शेतकरी खेळू थिटे,राजेंद्र जाधव,राम देवकर,संतोष थिटे यांनी आमच्या प्रतिनिधींकडे आपले मनोगत व्यक्त केले.