मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घआजाराने त्रस्त होते. गोवा- हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष नाट्यसेवा केली. रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी अभिनय केला. यासोबतच निवडुंग, पोरका, कैवारी, जावई माझा भला अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सुखटणकरांच्या निधनाने रंगभूमी आणि सिनेमांमधला नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला अशीच भावना व्यक्त केली जात आहे.
जवळपास ५० वर्ष सुखटणकर यांनी रंगभूमीची सेवा केली. या काळात त्यांनी कोणत्याही मानधनाची कधी अपेक्षा केली नाही. गोवा- हिंदू असोसिएशनचं नाव मोठं होण्यात सुखटणकरांचा मोठा वाटा असल्याचं साहित्यिक दिलीप चावरे यांनी एबीपी माझाला सांगितलं. सुखटणकरांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, मोहनदास यांनी कधीही प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. पडेल ते काम केलं आणि संस्था उभी केली.
त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची दोन दैवत, कुसूमाग्रज आणि पु.ल. देशपांडे या दोघांचंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं. सुखटणकरांना भेटायला दोन दैवतं एकाचवेळी त्यांच्या घरी गेले होते. असा योग किती कलाकारांच्या आयुष्यात आला असेल हा प्रश्न आहे. मोहनदास यांचे सर्वांशी अतिशय जवळचे आणि मैत्रीचे संबंध होते. श्रीराम लागू, वसंतराव कानिटकर ते अलिकडचा समीर चौघुले साऱ्यांशीच त्यांचे घनिष्ठ संबंध होते.