मनोरंजन

अवधूत 20 वर्षापासून नेमकं काय शोधतोय?

By Anuradha Kadam

मनोरंजन इंडस्ट्रीत नेहमीच एकापेक्षा अधिक कला असलेल्या कलाकांराना मागणी असते. गायक आणि अभिनेता असलेल्या कलाकारांची तर मनोरंजन इंडस्ट्रीला परंपराच आहे.

काही दिवस अभिनयाचा अनुभव गाठीशी आला की दिग्दर्शन आणि त्यानंतर निर्मितीक्षेत्रात उतरून यशस्वी झालेले कलाकारही इंडस्ट्रीत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे गायक, अभिनेता, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि परीक्षक अशा अनेक भूमिका पडदयावर साकारणारे व्यक्तीमत्व म्हणजे अवधूत गुप्ते.

तोडलस, जिंकलस, भावा, मित्रा हे शब्द रिअॅलिटी शोमध्ये गाजवणाऱ्या अवधूतला खरंतर प्रत्येक कलेतला सूर सापडला आहे, पण तरीही अवधूत त्याची हरवलेली एक गोष्ट आजही शोधत आहे. ती गोष्ट जर तुम्ही ऐकली तर तुम्हालाही असच वाटेल ज्याने कुणी अवधूतची ही गोष्ट दिलेली नाही त्याने ती लगेच आणून द्यावी.

  अवधूत जेव्हा २० वर्षापूर्वी दिल्लीत एका गाण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता, त्या स्पर्धेतील अनुभव त्याने परतीच्या रेल्वेप्रवासात लिहून काढले. ते अनुभववर्णन छापण्यासाठी एका प्रकाशक महिलेने नेले जे छापले तर नाहीच पण अवधूतला परतही दिलेले नाही.


अवधूतच्या वडीलांची जाहीरात कंपनी होती. जाहिरातींची जिंगल्स लिहिणे व ती चालबद्ध करणे हे त्यांचे काम होते. अवधूतला मात्र गायला आवडायचे. अवधूतने छंद म्हणून गावे पण गाण्यात करिअर करण्याचा विचार करू नये अशी त्याच्या वडीलांची इच्छा नव्हे तर ताकीद होती.

पण अवधूतच्या गाण्याला त्याच्या आईचा पाठिंबा होता. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये त्या काळात कलेला खूप वाव मिळायचा. त्यातूनच अवधूतने गाण्याच्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला. त्यातूनच अवधूतला गाण्याच्या रिअॅलिटी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

आईच्या कानावर ही गोष्ट घालून कुठल्यातरी विषयाच्या अभ्यासासाठी दिल्लीला जातोय असं कारण सांगून अवधूतने दिल्ली गाठली. अवधूत सांगतो, त्याकाळात रिअॅलिटी शोमध्ये गाण्याच्या स्पर्धेचं शूटिंग एकाचवेळी होत असे आणि शूटिंग पूर्ण झालं की मगच तो शो टिव्हीवर दाखवला जाई. त्यामुळे स्पर्धा संपेपर्यंत माझा हा उद्योग वडिलांना कळणार नव्हता हे नक्की.

आज जशी सारेगमप, इंडियन आयडॉल, सूरसम्राट, सूर नवा ही स्पर्धा असते त्याच धर्तीवर ती स्पर्धा होती. हिंदी असल्याने देशभरातून स्पर्धक आले होते. मीही खूप तयारीने उतरलो होतो. आणि त्या स्पर्धेत मी पहिलं बक्षीस मिळवलं. प्रत्येक स्पर्धकासोबत त्यांचे आईबाबा, शिक्षक, गुरू आले होते, तर माझ्यासोबत कुणीच नव्हतं. पण त्या स्पर्धेने मला खूप काही शिकवलं.

तो अनुभव मला पुढे कामी आला. मिळालेली ट्रॉफी घेऊन मी मुंबईच्या ट्रेनमध्ये बसलो आणि तो सगळा अनुभव त्या प्रवासात लिहून काढला. घरी आल्यावर आधी बाबांना सांगण्याचं टेन्शन होतं, त्यासाठी मला बाबांच्या एका जवळच्या मित्राची मदत झाली आणि काकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी स्पर्धेतल्या बक्षीसाविषयी सांगितलं. त्यावर बाबांची प्रतिक्रिया, हं…

झालं ना आता मनासारखं, आता नोकरीकडे लक्ष दया अशी होती. तेव्हा मी एका स्टुडिओत रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत होतो. जे अनुभव लेखन मी ट्रेनप्रवासात केलं होतं ते तसच हस्तलिखित स्वरूपात होतं.

एकदा  कुणाच्या मध्यस्थीने ते मला आठवत नाही, पण एक प्रकाशक महिला माझ्याकडे आल्या आणि काही लेखन आहे का छापायला असे विचारलं. मी ते अनुभववर्णन त्यांना दिलं.

त्या छापण्यासाठी घेऊन गेल्या. ती ओरिजनल कॉपी होती. पुढे मी खूप दिवस वाट पाहिली पण ना ते लेखन छापून आलं ना माझी ओरिजनल कॉपी मला परत मिळाली.

मी फार गांभीर्याने घेतलं नसल्याने त्या बाईंविषयी फार माहिती जाणून घेतली नाही, बर ज्यांच्या मध्यस्थीने त्या बाई आल्या होत्या, त्यांनाही त्यांची प्रेस कुठे आहे ते माहित नव्हतं. मी नंतर विसरून गेलो, पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यातील रिअॅलिटी शोमधलं बक्षीस पाहिलं की मला माझं ते ट्रेनमध्ये लिहिलेलं अनुभवलेखन आठवतं.

अनेक मुलाखतीमध्ये मी हा किस्सा सांगतो आणि सोबतच त्या बाईंपर्यंत ही गोष्ट पोहोचावी म्हणून आवाहनही करतो, पण अजूनतरी मला माझी ती हरवलेली गोष्ट सापडलेली नाहीय. 


अवधूतच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे तर त्याने दिग्दर्शित केलेला झेंडा हा सिनेमा खूप गाजला होता. तुझे देखके मेरी मधुबाला या अल्बममुळे अवधूत प्रकाशझोतात आला.

ऐका दाजिबा या गाण्याने तर धमाल उडवली. नुकताच प्रदर्शित झालेल्या पांडू या सिनेमाला अवधूतने संगीतच दिलेले नाही तर या सिनेमातील त्याने गायलेली गाणीही हिट झाली आहेत. यशाच्या शिखरावर असलेल्या अवधूतची नजर मात्र आजही संघर्षमय दिवसातील त्या पहिल्यावहिल्या लेखनाचा शोध घेत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment