पश्चिम महाराष्ट्र

व्हाट्सअप ग्रुप मधून काढल्याच्या रागातून ऍडमिनची जीभच कापली

पुणे – पुण्यात कोणताही गुन्हा करताना आता पोलिसांचा धाक उरला नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कुठे कोयता गॅंगची दहशत तर कुठे भर दिवसा गोळीबार. आता तर हद्दच पार झाली असं म्हणावं लागेल कारण पुण्यातील फुरसुंगी भागात व्हाट्सअप ग्रुप मधून टाकल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

पुण्यातील फुरसुंगीत हा भयंकर प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत अ‍ॅडमिनची जीभच कापली गेली आहे.

प्रीती किरण हरपळे (वय-३८) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार २८ डिसेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारस घडला आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फुरसुंगीत ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे. तक्रारदार प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्ष आहे. तक्रारदार व आरोपी हे एकाच सोसायटीत रहाण्यास असून सुरेश पोकळे यांनी हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना व्हाटॅसअपवरुन ‘तुम्ही मला ओम हाईटस ऑपरेशन’ या ग्रुप मधून रिमुव्ह का केले आहे? असा मेसेज केला. परंतु त्यास हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे पोकळे यांनी हरपळे यांना फोन करुन मला तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणून हरपळे यांचे ऑफीस मध्ये भेटण्यास आले.

याठिकाणी पोकळे यांनी सांगितले की, ‘तुम्ही मला ग्रुप मधून काढून का टाकले’ असे विचारल्याने किरण हरपळे यांनी ‘ ग्रुप मध्ये कोणीही कसलेली मेसेज टाकत आहे, त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला आहे’. असे सांगितले. त्यावर पोकळे याने त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या तोंडावर ठोसा मारुन इतर आरोपींना सदर ठिकाणी हरपळे यांचे पतीला मारहाण करुन जखमी केले आहे. यामध्ये त्यांची जीभच कापली गेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके पुढील तपास करत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment