शिक्षण

विदय़ार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती पळवून लावणारा अवलिया

कोल्हापूर विशेष

इंग्रजी भाषा ही भविष्यात अत्यंत महत्त्वाची आहे. जगाची भाषा अशी ओळख असलेल्या या भाषेला आपण नाकारून चालणार नाही. शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी इंग्रजी भाषा आली पाहिजे. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजी ज्ञान योग्य पद्धतीने मिळत नसल्याने त्यांना इंग्रजी शिकण्याचीच भीती वाटते. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अडथळा असल्याचे लक्षात आल्यामुळे या प्रयोगशील उपक्रमाला सुरूवात केली. यातून मला शिक्षक म्हणून खूप वेगळे समाधान मिळते.

मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागुलबुवा इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात ही जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर मुलांना त्याची गोडी लागेल आणि भीतीपेक्षा या भाषेसोबत त्यांची मैत्री होईल. 

या विचाराला कृतीची जोड देत कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणारे हे अवलिया शिक्षक गेल्या 12 वर्षांपासून या उपक्रमातून महापालिका शाळेतील मुलांना इंग्रजी शिकवत आहेत. त्यासाठी यादव यांनी आजवर २५० मोफत कार्यशाळा घेतल्या आहेत.

मोरेवाडी येथील शांतिनिकेतन स्कूल येथे इंग्रजी विषय शिकवणाऱ्या कृपाल यादव यांना २०११ मध्ये ही कल्पना सुचली. शिक्षण क्षेत्राचे विद्यार्थी असताना ग्रामीण भागात सराव पाठ घेताना त्यांच्या लक्षात आले की जिल्हा परिषद, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षित पालकांची नाही. अनेक आर्थिक अडचणींतून मार्ग काढत ही मुलं शाळेत येतात. 

त्यातच भविष्यातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्वाची गरज असूनही या मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती त्यांना या भाषेपासून दूर नेते. तेव्हाच यादव यांच्या मनात या प्रयोगशील उपक्रमाची सुरूवात झाली. स्वत:ची नोकरी सांभाळून उर्वरित वेळेत यादव यांनी त्यांच्या प्रयोगासाठी आठवड्यातील काही वेळ बाजूला काढला.

शिकवण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत यादव यांनी खेळ, कोडी, दैनंदिन जीवनातील शब्द, क्रिया यातून इंग्रजी भाषा शिकण्याची पद्धत तयार केली आहे. इंग्रजीची भीती मनातून जावी, मुलांना इंग्रजीतून संभाषण करता यावे, इंग्रजीतून कार्यालयीन काम, पत्रव्यवहार, संवाद याची समज यावी यासाठी यादव काम करतात. 

त्यासाठी लागणारे साहित्य यादव यांनी सुरूवातीच्या टप्प्यात स्वखर्चातून जमा केले. महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन त्यांनी मोफत कार्यशाळा सुरू केल्या.

कार्यशाळेच्या निमित्ताने शाळांमध्ये गेल्यावर, मुलांशी संवाद साधल्यावर यादव यांच्या लक्षात आले की अनेक मुलांकडे शालेय साहित्य नाही. घरातून आणण्यासाठी पैसे नाहीत. 

शाळांचीही यासाठी आर्थिक क्षमता नाही. त्यासाठी यादव यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले. यादव यांच्या मोफत उपक्रमशील प्रयोगाची माहिती झाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शालेय साहित्याची मदत उभी राहिली. 

त्यातून मोफत कार्यशाळेत इंग्रजी शिकण्यासाठी येणाऱ्या गरीब मुलांना शालेय साहित्य वाटण्यात आले. आजपर्यंत यादव यांनी पाच हजार गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या ज्ञानासोबत शालेय साहित्याचीही मदत केली आहे. 

यादव यांच्या कार्यशाळेत दहा हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवगत केली आहे. यादव यांनी एमए, बीएड या पदवीसह स्कूल मॅनेजमेंट या विषयात पदविका शिक्षण घेतले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट या विषयातही ते तज्ज्ञ आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment