शिक्षण

शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांनी का दिला आत्मदहनाचा इशारा ?

अधिविभागप्रमुखपद नियुक्तीवरुन दोन गुरुजींमध्ये जुंपली

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या अधिविभागप्रमुखपद नियुक्तीवरुन पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार व विद्यापीठातील प्रचलित नियमानुसार विभागप्रमुखपदावर प्रा. डॉ. जी.बी.कोळेकर यांनी दावा केला आहे.

तसेच विभागप्रमुखपदी नियुक्त केले नाही तर हा माझ्यासाठी मोठा धक्का असेल. मला आत्मदहन करण्यापासून काही पर्याय राहणार नाही असा मेल कुलगुरूुंना केला आहे. दुसरीकडे प्रा. डॉ. एस.एस. चव्हाण यांनी विभागप्रमुखपदी मी योग्य आहे मात्र विद्यापीठाकडून नियुक्तीस टाळाटाळ होत असल्याची तक्रार राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे केली होती.

आयोगाने, विद्यापीठाला चव्हाण यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करावी व  त्यांना त्रास होणार नाही यासंबंधीची हमी द्यावी अशी शिफारस केली आहे. दरम्यान विभागप्रमुख नियुक्तीचा अधिकार हा कुलगुरुंच्या अखत्यारित आहे.यामुळे कुलगुरू काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षभराहून अधिक काळ रसायनशास्त्र विभागप्रमुख नियुक्तीचा वाद सुरू आहे. कोळेकर की चव्हाण यापैकी कोणाची नियुक्ती करायची यावरुन हा प्रश्न चर्चेत आहे. चव्हाण यांनी प्रशासनाकडून विभागप्रमुखपद काढून घेतल्यानंतर याप्रश्नी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली आहे.

आयोगाने,  चार जानेवारीला विद्यापीठाला चव्हाण यांची  नियु करावी अशी शिफारस केली आहे. मात्र आयोगाच्या शिफारसीच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे सध्याचे विभागप्रमुख डॉ. जी.एस. गोकावी हे ३१ जानेवारी २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखपद नियुक्तीचा वाद ऐरणीवर आला आहे.

डॉ. जी.बी. कोळेकर यांनी कुलगुरू डॉ.शिर्के यांना ईमेल करुन वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच विद्यापीठातील प्रचलित पद्धतीनुसार व रसायनशास्त्र विभागातील सेवाज्येष्ठतेनुसार माझी नियुक्ती अपेक्षित आहे. मला खात्री आहे की शाहूनगरीत वसलेल्या विद्यापीठामध्ये माझ्यावर अन्याय होणार नाही.

विद्यापीठ प्रशासन मला रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्त करेल.वास्तविक पाहता माझी ही नियुक्ती एक सप्टेंबर २०२१ रोजी व्हायला हवी होती.परंतु माझ्या ऐकण्यात असे आले आहे की, रसायनशास्त्र विभागातील अन्य एक प्राध्यापक ज्यांचा सेवाज्येष्ठता क्रम चार आहे व ज्यांच्या विरोधात स्वत: विद्यापीठ प्रशासनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असताना अशा प्राध्यापकास केवळ दबावाखाली विभागप्रमुखपदावर नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र मला पूर्ण खात्री आहे की,माझ्यावर अन्याय न करता विभागप्रमुखपदी नियुक्ती कराल. परंतु जर मला, आपण अधिविभागप्रमुखपदावर नियुक्त केले नाही तर हा माझ्यासाठी मोठा धक्का असेल.

मला आत्मदहन करण्यापासून काही पर्याय राहणार नाही.माझ्या मानसिक स्थितीस व माझ्या वैयक्तिक नुकसानीस कुलगुरू या नात्याने आपण सर्वस्वी जबाबदार असाल.”असे कोळेकर यांनी ईमेल निवेदनात म्हटले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment