कोंकण विज्ञान

कोकण किनारपट्टी समुद्री कासवांना का वाटतेय सुरक्षित ?

लहानपणी ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपण ऐकली असेल. या शर्यतीत कासवाची स्पर्धा फक्त सशाशी होती. या शर्यतीत कासव जिकतो. पण प्रत्यक्षात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची जगण्याची शर्यत जन्माच्या अगोदरच सुरु होते. कोकणातील कासवमित्र कासव संवर्धनाचे प्रयत्न कित्येक वर्षे करीत आहेत. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या प्रजातीचे संरक्षण मानव हितासाठी गरजेचे आहे.

विवेक ताम्हणकर,  कोंकण

कोकण किनारपट्टी ऑलिव्ह रिडले कासवांना आता सुरक्षित वाटू लागली आहे. मालवणच्या देवबाग पासून मुरुडच्या किनाऱ्यापर्यंत कासवांच्या विणीच्या हंगामात अंडी घालण्याचे प्रमाण वाढले आहे.

कासवमित्र संघटनांची मेहनत या मागे महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे लोक जागृतीही कासव संवर्धनात मोठी भूमिका बजावत आहे. यंदाच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या देवबाग समुद्र किनारी कासवांनी अंडी घातली आहेत. येथील कासवमित्रांनी त्यांची ही घरटी सुरक्षित केली आहेत.

दोन वर्षानंतर ऑलिव्ह रिडले कासव देवबाग किनारी  

पर्यटनामुळे गजबजलेल्या देवबाग किनारी तब्बल दोन वर्षानंतर ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातल्याची सुखद घटना घडली आहे. एकेकाळी समुद्री कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून देवबाग किनाऱ्याची ओळख होती. परंतु गेल्या काही वर्षात पर्यटनामुळे येथील किनारे गजबजल्यामुळे दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांनी या ठिकाणी अंडी घालण्याचे प्रमाण कमी केले.

गतवर्षी एक कासव या ठिकाणी अंडी घालण्यासाठी आले मात्र ते अंडी न घालताच परत गेले असल्याची माहिती कासव संवर्धन चळवळीतील कार्यकर्ते संदीप बोडवे यांनी सांगितले.


विशेष म्हणजे कोकण किनारपट्टी कासवांना सुरक्षित वाटू लागली आहे. यंदाच्या कासव विणीच्या हंगामात सुरवातीलाच देवबाग येथे स्कुबा डायव्हिंग सेंटर जवळील समुद्र किनारी  मादी कासवांनी अंडी घातली. येथील मच्छिमारांच्या हे लक्षात येताच त्यांनी कासवमित्र पंकज मालंडकर यांना ही माहिती दिली. मालंडकर यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना गोळा केले आणि घरट्याच्या रक्षणाची व्यवस्था केली.

कासवांच्या प्रजननासमोरील  धोके

सागरी कासवांच्या सात प्रजातींपैकी पाच भारतात आढळतात. त्यापैकी ‘ऑलिव्ह रिडले’ ही प्रजाती कोकण किनारी आढळते. या प्रजातीतील कासवे दुर्मिळ होऊ लागल्याने तिच्या बचावासाठी भारतीय तटरक्षक दलाने पुढाकार घेतला.

देशाचा किनारा राखताना किनारी जैवविविधता आणि विविध प्राणी यांचे संरक्षण करण्याची गरज लक्षात घेऊन तटरक्षक दलाने मच्छिमारांना कासवाची अंडी किंवा पिल्लांचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या. चार वर्षांपूर्वी ही मोहीम तटरक्षक दलाने हाती घेतली असली, तरी कासवे वाचवण्याची मोहीम कोकणात १४ वर्षांपूर्वीच सुरू झाली.


कोकणातील समुद्राच्या वाळूचे विशिष्ट तपमान या कासवांची अंडी उबविण्यासाठी मानवते. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून ती किनाऱ्यालगत प्रजननासाठी येतात. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा या कासवांचा विणीचा हंगाम असतो.

या प्रजातीचे मादी कासवे या कालावधीत सागरी किनाऱ्याच्या वाळूमध्ये सर्वांत उंच लाटांच्या पातळीपासून ५० ते १०० फूट अंतरात एक ते दीड फूट खोलीचा खड्डा खोदून त्यामध्ये सुमारे शंभर ते दीडशे अंडी घालतात. अंडी घातल्यावर मादी कासवे या खड्ड्यात वाळू भरून समुद्रात निघून जातात.


या अंड्यांची उबवण, त्यातून पिलांची निर्मिती आणि जन्मलेली पिले समुद्रात जाणे ही सर्व प्रक्रिया निसर्गावर अवलंबून असते. या निसर्गचक्रामध्ये अनेक अडथळे असतात. खोल खड्ड्यात घातलेली अंडी कुत्रे, कोल्हे, उंदीर-घुशी उकरून खाऊन टाकतात. माणसांकडूनही अंड्यांचा खाण्यासाठी वापर केला जातो. मटणासाठी कासवे मारली जातात.

कोकणात  कासव संवर्धनाची लोकचळवळ

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या पहिल्या शेड्यूलमध्ये या कासवाचा नष्टप्राय प्रजातीमध्ये समावेश झाल्यानंतर वन विभागानेही कायद्याची स्थानिक पातळीवर कडक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही सुरू केली.

मासे पकडताना जाळ्यात फसलेले कासव किंवा त्यांची पिल्ले सुरक्षित पाण्यात सोडावीत, कासवांची किनाऱ्यावरची अंडी नष्ट करू नयेत, कासव पकडणाऱ्याला रोखावे, असे आवाहन तटरक्षक दलानेही केले होते. त्याला प्रतिसाद मिळावा आणि कायद्याची अंमलबजावणी होतानाच कासवांचे संवर्धनही व्हावे, यासाठी कोकणातील अनेक कासव मित्रांनी पुढाकार घेतला.


वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या पहिल्या शेड्यूलमध्ये या कासवाचा नष्टप्राय प्रजातीमध्ये समावेश झाल्यानंतर वन विभागानेही कायद्याची स्थानिक पातळीवर कडक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने कासव संवर्धनाचे मोठे काम हाती घेतले.  मंडणगड तालुक्यात वेळास हे कासवांचे अंडी घालण्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे.


संस्थेने या परिसरातील मच्छिमारांचे प्रबोधन केले. त्यांना माहिती दिली. ही कासवे वाचविणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना पटवून दिले. त्यामुळे कासवे मारून खाण्याचे प्रमाण या भागात कमी झाले.

मंडणगडबरोबरच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दापोली, गुहागर, राजापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले तसेच रायगड जिल्ह्यातही हरिहरेश्वरसारख्या भागात संस्थेच्या कामाचे अनुकरण करत कासव मित्रांनी कासवे वाचविण्याची आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली.

कोकणात भरतात कासव महोत्सव

४० ते ६० दिवसांनी या अंड्यांमधून कासवांच्या पिलांचा जन्म होतो. जन्मताच हि पिल्ले समुद्राच्या दिशेने धाव घेतात. लाटांवर स्वार होऊन आपल्या आईच्या कुशीत विसावण्यासाठी जाणाऱ्या या पिल्लाना खाण्याकरता अनेक पक्षी घिरट्या घालत असतात.

पूर्वी जन्मल्यानंतर समुद्रात जाण्यात यशस्वी होण्याचे पिल्लांचे प्रमाण ४० टक्के होते. कासव मित्रांनी पिल्लांच्या समुद्रात जाण्याच्या या नजाऱ्याचा कासव महोत्सव आयोजित करायला सुरवात केला. जन्मताच समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या या पिल्लाना पाहण्याचे कुतूहल पर्यटकांना भावले.


आज मोठ्या संख्येने पर्यटक कोकणच्या किनाऱ्यावर येतात. कासवांची पिल्ले समुद्रात जात असताना मोठ्या संख्येने लोकं समुद्र किनारी उपस्थित असल्याने पक्षांना या पिलांना भक्ष बनवता येत नाही, परिणामी पिलांच्या समुद्राच्या दिशेने जाण्यात आजी त्यांची मर कमी होण्यास मदत झाली आहे.

कासव महोत्सवाचा या बरोबर किनारी भागातील पर्यटन व्यवसाय वाढीवरही चांगला परिणाम झाला त्यातून किनारी भागातील लोकांचे अर्थकारण वाढले आहे.

वायंगणी कासवांचे एक “मॅटर्निटी होम”

ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. त्यानिमित्ताने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी या ठिकणी कासव जत्रा भरविण्यात येते. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ही कासवं या किना-यावर येऊन अंडी घालतात.

या अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत. तसेच कुत्रे किवा अन्य प्राण्यांपासून त्यांचं भक्षण होऊ नये, यासाठी गावकरी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत तिथे जाळे बसवतात आणि ५५ ते ६० दिवसांनी पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचा-यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडलं जातं.

आणि कासव जगण्याची हरलेली शर्यत जिंकत आहेत !

लहानपणी ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपण ऐकली असेल. या शर्यतीत कासवाची स्पर्धा फक्त सशाशी होती. या शर्यतीत कासव जिकतो. पण प्रत्यक्षात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची जगण्याची शर्यत जन्माच्या अगोदरच सुरु होते.

कोकणातील कासवमित्र कासव संवर्धनाचे प्रयत्न कित्येक वर्षे करीत आहेत. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या प्रजातीचे संरक्षण मानव हितासाठी गरजेचे आहे. हा प्रयत्न मर्यादित स्वरुपात न रहाता कासव जत्रेच्या निमित्ताने सर्वदूर पोहचत आहे. लोकांना याचे महत्व पटत आहे. कासवांच्या जगण्याची शर्यत अवघड असली तरी ऑलिव्ह रिडलेंची छोटी पिल्ले निसर्गप्रेमींच्या मदतीने ही शर्यत जिंकत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment