ठाणे – ठाण्यात दुचाकी चोरी प्रकरणात महिला पोलिस अधिकाऱ्याचा पती सह आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात दुचाकी पोलीस अधिकाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांनी या दुचाकी चोरीच्या प्रकरणी शोध घेत असताना संशयित तरुणांना दुचाकीवरून फिरताना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांवर आळा घालण्यासाठी परिमंडळ ५ चे उप आयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोहीम सुरु करण्यात आली होती. या मोहिमेखाली सहाय्यक पोलीस आयुक्त तथा वर्तकनगर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले. या मोहिमे अंतर्गत संशयित आरोपींवर पाळत ठेवणे अश्या सूचना देण्यात आल्या होत्या. या मोहिमे दरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला संशयित रित्या फिरत असताना हटकले. या संशयित तरुणाने पोलिसांना पाहून तेथून पळून केला मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याने आपल्या जवळ असलेली गाडी हि चोरीची असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. रुपेश पवार असे या अटक करण्यात तरुणाचे नाव आहे. रुपेश पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यांच्याकडून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे ७ दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली.
रुपेश पवार हा ३० वर्षीय तरुण हा दुचाकी गाड्यांची पाळत ठेवून त्याच्या जवळील मास्टर कि च्या मदतीने तिचे लॉक खोलून संधी मिळताच गाडी घेऊन पोबारा करत होता. चोरी केलेल्या गाड्या रुपेश गाव खेड्यांमध्ये विकत होता. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून नवनाथ महादेव वीरकर याला म्हसवड सातारा येथून ताब्यात घेतले. या नवनाथ वीरकरची पोलिसांनी चौकशी केली असता तो महिला पोलीसचा पती असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी रुपेश पवार कडून ७ चोरी केलेल्या गाड्या आणि एका मोबाईल फोन असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता नवनाथ वीरकर याची जामिनावर सुटका झाली आहे. तर रुपेश पवार याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकारणी अटक आरोपीने या आधी अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत. आणि त्याने आणखी कोणाला अशा प्रकारच्या चोरीच्या दुचाकी अवैध रित्या विकल्या आहेत याचा तपास वर्तकनगर पोलीस करत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी सांगितले.