महाराष्ट्र

महिलांनो संकटात सापडला तर १८१ नंबर डायल करा

राज्यातील महिला, युवतींना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने १८१ टोल फ्री क्रमांकाची मुख्यमंत्री हेल्पलाईन १९ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यास मंजुरी दिली होती. यानंतर १८१ ही टोल फ्री हेल्पलाईन मुख्यमंत्री हेल्पलाईनमध्ये विलीन केली होती. मुख्यमंत्री हेल्पलाईनकडे संकटग्रस्त, पीडित महिलांचे कॉल्स येत होते. मुख्यमंत्री हेल्पलाईनकडे महिलांशी संबंधित कॉल्सकरिता आवश्यक माहितीच्या अनुषंगाने प्रशिक्षित कर्मचारी तसेच पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे अशा महिलांना आवश्यक ते सहाय्य तत्काळ उपलब्ध करून देणे शक्य होत नव्हते. तसेच महिलांविषयक कॉल्सची मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक आकडेवारी महिला व बाल विकास विभागाला उपलब्ध होत नव्हती.

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिला व बाल विकास विभाग महिलांसाठी ‘१८१’ ही स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन सुरू करणार आहे. महिला व बाल विकास आयुक्त यांच्या स्तरावरूनही राज्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनसाठी मानक कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून २४ तास सुरू राहणार्‍या या हेल्पलाईनसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक केली जाणार आहे.

हेल्पलाईनद्वारे ही मदत मिळणार
पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, वन स्टॉप केंद्र आदी आपत्कालीन सेवा
शासकीय योजना, कार्यक्रम, सुविधा, मानसिक-सामाजिक समुपदेशन
परिसरातील हुंडा प्रतिबंधक, बालविवाह, संरक्षण अधिकार्‍यांशी संपर्क
चाईल्ड लाईन, महिलांविषयक कायदे, संपत्तीविषयक कायदे मार्गदर्शन
सशक्तीकरण आणि विकास (कौशल्य, शिक्षण, आर्थिक समावेशन)

संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीने मदत मिळावी याकरिता’१८१ महिला हेल्पलाईन’ स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहे. महिला व बाल विकास आयुक्त यांच्या स्तरावरून ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment