पश्चिम महाराष्ट्र

कामगार नाट्य स्पर्धा ६८ व्या नाट्य महोत्सव सुरू

कोल्हापूर – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे विभागीय ६८ व्या नाट्य महोत्सवाची प्राथमिक फेरी कोल्हापूर मध्ये केशवराव भोसले नाट्यगृहात २ जानेवारी पासून सुरु झाली.. पुणे, सोलापुर, सांगली, सातारा व कोल्हापुर भागातील जवळपास १८ दोन अंकी नाटके सादर होत आहेत.. ही नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहेत.
.
पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मा. समाधान भोसले व कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांचे मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम आयोजनात कोल्हापूर मधील कर्मचारी केंद्र संचालक चंद्रकांत घारगे, दिपक गावराखे, विजय खराडे, सचिन खराडे, सचिन शिंगाडे, विकास पाटील अक्षया मोहिते, स्वाती वायचळ, सुचित्रा चव्हाण, ज्योती डावरे, श्वेतल सुतार, मंगल बेळगावकर, सुजाता बुधले, सुजाता कलकुटकी, मोरे, अशोक कौलगी आदिंनी सहभाग नोंदवला. उद्घाटन कार्यक्रमानंतर बँलन्सशिट या कामगार कल्याण केंद्र वारणानगर च्या नाटकाने महोत्सवाची सुरुवात झाली.

महाराष्ट्रात जवळपास ७० वर्षापासून सुरु असलेली ही कामगार नाट्य स्पर्धा नाट्यक्षेत्रासाठी महत्त्वाची अशीच आहे. सिने व नाट्य क्षेत्रातील बहुतेक सर्वच दिग्गज कलाकारांनी या मंचावरुन सुरुवात केलेली आहे. तीन अंकी नाटकांपासुन ही सुरुवात झाली व त्यानंतर दोन अंकी नाट्यस्पर्धा कितीतरी नवोदित व तरुण, कष्टकरी कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ होत गेली. याद्वारे आपल्या कलेला रसिकांसमोर सादर करुन रसिकांचे व प्रामुख्याने कष्टकरी समाजाचे मनोरंजन करत ही नाट्यचळवळ पुढे आली. या नाट्यस्पर्धेचा उल्लेख अनेक दिग्गज कलावंत वारंवार आपल्या मुलाखतीत करतात. व आपल्या जडणघडणीत या स्पर्धेचा मोठा वाटा असल्याचे आवर्जुन सांगतात. कोल्हापूर मधील नाट्य, सिने व टी.व्ही सिरीयल मधील बहुतांशी कलावंत हे या स्पर्धेत कधीना कधी उतरलेले आहेतच. ५० टक्के कामगार पुरुष व इतर हौशी कलावंत रंगमंचावर आपला अभिनयाचा अविष्कार सादर करीत आलेले आहेत. महाराष्ट्रातील नाटकांची ही परंपरा जोपासण्याचे महत्वपूर्ण काम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या स्पर्धेने अविरतपणे केले आहे. कामगार आणि समाजातील सर्वच घटकांना सामावून घेत व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या शासनाच्या या कामगार विभागाचा राहीला आहे.

२ ते २५ जानेवारीत शनिवार व रविवार वगळून दररोज अशी १८ नाटकांतील कलाविष्कार पाहता येणार आहे. विविध सामाजिक विषयांना स्पर्ष करणारी नाटके ही या नाट्यमहोत्सवाची खासियत म्हणता येईल. यावेळी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव तसेच जेष्ठ रंगकर्मी दिलीप बापट, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, उद्योजक हरिश्चंद्र धोत्रे, परीक्षक संजय हळदिकर, उदय कुलकर्णी व सुनिल माने हे उपस्थित होते. यावेळी रंगकर्मी कपिल मुळे, किरण चव्हाण व प्रशांत जोशी यांचा नाट्यचळवळ वृद्धिंगत करणे करीता विशेष सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्पर्धा समन्वयक संघसेन जगतकर यांनी तर आभार प्रदर्शन कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन व संयोजन केंद्र संचालक संघसेन जगतकर तर आभार प्रदर्शन कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी केले. कार्यक्रमास अनेक नाट्यरसिक, कंपन्यांचे एच.आर. अधिकारी, गुणवंत कामगार, कामगार नेते, विविध युनियन पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment