महाराष्ट्र

राज्य शासनाच्या दिनदर्शिकेत छापली चुकीची राजमुद्रा

सहय़ाद्री इतिहास संशोधन केंद्राने आणली चूक निदर्शनास;

राजर्षी शाहू महाराजांचाही विसर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 2022 च्या दिनदर्शिकेत छापण्यात आलेली राजमुद्रा चुकीची आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रावरील राजमुद्रा आणि दिनदर्शिकेत छापलेल्या या राजमुद्रेची कॅलिग्राफी यामध्ये मोठा फरक आहे, असे सहय़ादी इतिहास संशोधन केंद्राचे अध्यक्ष इंद्रजित सावंत आणि सचिव अमित आडसुळे यांनी म्हटले आहे.

ही दिनदर्शिका प्रकाशित करताना राज्य शासनाला राजर्षी शाहू महाराज यांचाही विसर पडल्याची खंत व्यक्त करत दिनदर्शिकेतील दोष दूर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहय़ादी इतिहास संशोधन केंद्राच्या वतीने पत्रही पाठविण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की ः मराठी लोकभाषा, राजभाषा, ज्ञानभाषा, धर्मभाषा अशा आशयाने राज्य शासन मराठी भाषेचा इतिहास आपल्या दिनदर्शिकेतून लोकापर्यंत पोहचवत असते.

ही संकल्पना चांगली आहे. 2022 च्या दिनदर्शिकेत ऑक्टोबर महिन्यात श्री शिवछत्रपतींची मुद्रा दाखविली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे. शिवरायांच्या अस्सल पत्रावरील मुद्रा आणि या मुद्रेच्या कॅलिग्राफीत मोठा फरक आहे.

त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यातच शिवरायांनी मराठी भाषा शुद्धिकरणासाठी तयार केलेल्या राजव्यवहार कोषासंदर्भात माहिती देताना राजाभाषा व्यवहार कोषाचे म्हणून शिवरायांनी इंदापूरच्या संभाजी भोसले-देशमुख यांना लिहिलेल्या पत्राचे छायाचित्र छापले आहे.

या पत्रात फारसी शब्दांचा भरणा आहे. तसेच हे पत्र शिवराज्याभिषेकापूर्वीचे आहे. त्यामुळे राज्याभिषेकानंतरचे भाषाशुद्धीचा प्रभाव असणारे पत्र देणे योग्य होते राजर्षी शाहू महाराजांचा विसर मराठी भाषेच्या विकासासाठी कार्य करणाऱया, मोडी लिपी समजत नसल्याने सर्व सामान्य मराठी माणसाची फसवणूक होवू नये यासाठी मराठी भाषेतून आपल्या संस्थानातील सर्व शासकीय व्यवहार सुरू करणाऱया राजर्षी शाहू महाराजांचा साधा उल्लेखही या शासकीय दिनदर्शिकेत करण्यात आलेला नाही, याकडेही सावंत, आडसुळे यांनी लक्ष वेधले आहे.

शासनाच्या दिनदर्शिकेत चुका होणे खूपच गंभीर आहे. शासनाच्या सर्वच गोष्टींना अधिकृत मान्यता आणि संदर्भमूल्य प्राप्त होत असते. या गोष्टींचा विचार करून दिनदर्शिकेतील दोष दूर करावेत. राजर्षी शाहू महाराजांचे नाव व किमान छायाचित्र दिनदर्शिकेत यावे, अशी अपेक्षा आहे – इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment