पश्चिम महाराष्ट्र

यंदाचा भद्रकाली ताराराणी पुरस्कार राहीबाई पोपेरे यांना जाहीर

कोल्हापूर – ताराराणी विद्यापीठाच्या वतीने दर दोन वर्षांनी देण्यात येणारा भद्रकाली ताराराणी पुरस्कार यंदा बीजमाता अशी जगभरात ओळख असलेल्या राहीबाई पोपेरे यांना जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही टी पाटील यांच्या २८ व्या स्मृतिदिनी १७ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात राहीबाई पोपेरे यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख शाल श्रीफळ गौरव पत्र आणि भद्रकाली ताराराणीचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती तारा राणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .

डॉ. पाटील म्हणाले ताराराणी छत्रपती ताराराणीच्या पराक्रमाला शोभेल अशा राष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व संपन्न महिलेचा यथोचित सन्मान करावा म्हणून भद्रकाली ताराराणी पुरस्काराची परंपरा सुरू करण्यात आली. १९९० साली पहिला पुरस्कार राजमाता विजयाराजे शिंदे यांना प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर गेली ३२ वर्षे ही परंपरा सुरू आहे. विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आधुनिक युगातील ताराराणींचा गौरव व्हावा अशी भूमिका या पुरस्कारामागे असल्याचेही त्यांनी सांगितले

यंदा २०२३ सालचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पोपेरेवाडी येथील रहिवासी महिला शेतकरी राहीबाई सोमा पोपेरे यांना देण्यात येणार आहे. पोपेरे या गेल्या ३० वर्षापासून पारंपारिक बियाणांच्या वाणाचे संरक्षण आणि संवर्धन करत आहेत. विषमुक्त आणि रसायन विरहित शेतीचे महत्व ओळखून राहीबाई यांनी आपल्या परसबागेत देशी वाणाच्या फळभाज्या कडधान्ये तृणधान्ये यांची लागवड केली. त्याद्वारे देशी पिकांचे १५४ वाण त्यांनी तयार केले. राहीबाईंच्या या कार्याची नोंद घेऊन बायफ या संस्थेने त्यांना राहत्या घरी बियाणे बँक तयार करून दिली आहे. राहीबाईंच्या बियाणे बँक ला देश विदेशातील अनेक नागरिक भेट देत असतात. या माध्यमातून राहीबाई यांनी तीन हजार शेतकऱ्यांना देशी वाणांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. राहीबाई यांच्या देशी वाणाचा संग्रह आणि ज्ञान पाहून प्रख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना सीड मदर म्हणून गौरवले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment